श्रीपंचकृष्ण अवतार परंपरा

जय श्रीकृष्ण

    कृतयुगामध्ये सनक, सनकादिक, सनतकुमार व सनतनंदन हे ब्रह्मदेवाच्या वरामुळे जन्मलेले चार पुत्र. त्यांनी ब्रह्मदेवापासून सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, "हे तात, पुष्कळ ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितले, परंतु त्यामध्ये जीवांच्या उद्धाराचे म्हणजेच जन्म-मरणाच्या फे-यांपासून मुक्त होऊन परमेश्वराचे सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त करण्याचे मोक्षाचे ज्ञान सांगितले नाही. तरी ते आम्हाला सांगा." ब्रह्मदेवाला ते ज्ञान नसल्यामुळे तो चिंतातूर होऊन त्याने अंतरी परमेश्वराचा धावा केला "हे परमेश्वरा, माझी लाज राख." त्यावेळी परब्रह्म परमेश्वराने हंसावतार घेऊन सनक, सनकादिकांना ब्रह्मविद्येचे ( मोक्षमार्गाचे ) ज्ञान दिले. 

    कृतयुगापर्यंत ते ज्ञान काही प्रमाणात होते. नंतर काळाच्या ओघात त्या ज्ञान धर्माला ग्लानी येऊन मूळ तत्व विराम पावले. त्यामुळे अनेक ऋषी - मुनी अगदी तन्मयतेने देहाची पर्वा न करता तपश्चर्या करतांना व भक्तीमार्गाविषयी चर्चा करीत असता ऋषी ऋषींमध्ये मतांतरे होऊन अवांतर भक्तीमार्ग उदयाला आले. त्या भोवऱ्यात सामान्य जनता अडकून त्याप्रमाणे धर्माचरण करू लागली. मोक्षमार्गाच्या ज्ञानापासून वंचित झाली.

    अशावेळी जीवांचा भवदु:खातून उद्धार करण्यासाठी त्रेतायुगी परब्रह्म परमेश्वराने श्रीदत्तात्रेय प्रभुंच्या रुपाने अत्रि पिता व अनसूया मातेच्या ठायी चिरायू अवतार धारण केला. ते एक मूखी दत्तात्रेय म्हणून प्रसिद्ध आहेत. अनसूया मातेचे सत्व हरण करण्यासाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णु, महादेव या तिन्ही देवाचे बालके बनवून गर्वहरण केले. सहस्त्रार्जुनाला सहस्त्र भुजा दिल्या. गोरक्षाला व मूळ शंकराचार्याला जगन्मान्य होण्याचा वर दिला. अर्ळक व यदुराजाला ब्रह्म विद्याज्ञान देऊन अनंत जीवांचा उद्धार केला. ते ज्ञान त्रेतायुगापर्यंत काही प्रमाणात चालत आले.

    द्वापारयुगामध्ये काळाच्या ओघात ब्रह्मविद्याज्ञान नष्ट होऊन अधर्माचे बंड माजले. धर्माच्या नावाखाली मंत्र, तंत्रादि भक्ती करुन शक्ती प्राप्त करुन घेणे व त्या शक्तीच्या जोरावर विज्ञानाची साथ घेऊन युद्धपातळीवर विज्ञानाची प्रगती झाली. त्याचा वापर विनाशाकडे होऊ लागला. कंसादी दैत्य, दानव जनतेवर व ऋषी मुनींवर अत्याचार करू लागले. दुर्योधनादि कौरव यांनीही त्याच मार्गाचा अवलंब करून अत्याचारास सुरुवात केली. अशा कठीण समयी परब्रह्म परमेश्वराने श्रीकृष्ण भगवंताच्या रुपाने कंसाच्या बंदिशाळेत वसुदेव देवकी पासून अवतार धारण केला. कंसादि दैत्याचे निर्दालन करून उग्रसेनाला राज्य दिले. दुर्योधनादि दुर्जनांचा नाश करुन पांडवादि भक्तांचे रक्षण केले. उध्दवादि भक्तांना प्रेम देवून अर्जुनाला निमित्य करून अनंत जीवांच्या उद्धारासाठी 'श्रीमद्भगवद्गीता' हे ब्रह्मविद्याज्ञान निरोपण केले. धर्माची स्थापना केली. 

    यशोदेमातेच्या मातृ प्रेमाचा स्विकार करुन तिचा उद्धार केला. सोळा सहस्र गोपींना भौमासूर या दैत्याने बंदिशाळेत बंदिस्थ ठेवले होते. त्या भौमासुर दैत्याचा वध करुन गोपिकांची मुक्तता केली व निराधार झालेल्या गोपिकांच्या विनंती वरुन त्यांचा स्वीकार करुन उद्धार केला. जगामध्ये शांतता प्रस्थापित केली. ईश्वराच्या एकनिष्ठ भक्ती शिवाय जीवनात सुख, शांती व मनुष्य जन्माचे ध्येय ( मोक्ष ) प्राप्त होत नाही, म्हणून इंद्रादिक अनेक देवी देवतांची भक्ती सोडून गोकुळस्थ जनांना एकाच परमेश्वराची भक्ती करण्यास प्रवृत्त केले. जातीभेदादि विषमता नष्ट करून स्त्री, शुद्रांना समान अधिकार दिले. मनुष्य हा जन्माने श्रेष्ठ नसून कर्माने श्रेष्ठ आहे. मनुष्याने अभिमान रहित होऊन शुद्धाचरणाने एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करावी. अशा जीवांचा, पांडवांप्रमाणे अभिमान घेऊन परमेश्वर त्वरीत उद्धार करतात. कलियुगापर्यंत श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीता तत्वज्ञानाचा प्रसार सर्वत्र झालेला होता. 

    सर्व भारतीयांनी ते ज्ञान स्वधर्म आणि श्रीकृष्ण भगवंतांना कुलदैवत म्हणून स्वीकारले होते. परंतु हळूहळू धर्माला ग्लानी येऊन अकराव्या शतकात त्याचा कळस झाला. काही धर्मधूरीणांनी भगवद्गीतेतील समानतेचा व मानवाच्या उन्नतीचा दिव्य संदेश डावलून, ऐहिक स्वार्थापोटी मानवाचा बुद्धीभेद करून, जातीभेदाच्या वर्ण विषमतेच्या शृंखलेमध्ये मानवाला जखडले. अन्य ग्रंथांचे श्रेष्ठत्व पटवून देऊन स्वधर्मापासून भ्रष्ट केले. हेमाद्रीच्या 'चतुर्वर्ग चिंतामणी' ग्रंथाने विषमतेचा व कर्मकांडाचा कळस केला. वर्षाचे जवळपास दोन हजार व्रते तयार करून राजसत्ता हातात असल्यामूळे त्याचे कायद्यात रुपांतर केले. सक्तीने ती व्रते जनतेकडून करवून घेतली. काही काळाने तसेच संस्कार होऊन तोच कुलधर्म होऊन बसला व खऱ्या गीताज्ञानापासून जनता वंचित झाली. गीतेचे ज्ञान नसल्याकारणाने लोक अंधश्रन्द्रेला, कर्मकांडांना, चमत्कारांना बळी पडून अनेक देवी - देवतांची भक्ती करू लागले. जातीभेदाचे बंड माजून समाजामध्ये विषमता निर्माण झाली. स्त्री शुद्रांना धर्माचे दरवाजे बंद झाले. स्त्रियांनी चुल आणि मूल हेच जीवन समजून पतीची सेवा करावी. या व्यतीरिक्त धर्म करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. समाजात स्वैराचार पसरुन समाज दिशाहिन झाला होता. 

    अशावेळी परब्रह्म परमेश्वराने कलीयुगामध्ये सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामींच्या रुपाने अवतार धारण केला. गुजरात राज्यातील भरवस ( भडोच ) नगरी येथे त्रिमल्लदेव राजा राज्य करीत होता. त्याला पुत्र संतान नव्हते. म्हणून त्याने श्री सिंहास दत्तक घेतले. गुजरात शेजारी महाराष्ट्रात त्यावेळी देवगिरीस यादव घराण्याची सत्ता होती. यादव राजाने खोलेश्वर. नावाच्या आपल्या सेनापतीस गुजरातवर स्वारी करण्यास पाठविले. त्रिमल्लदेवाच्या व यादवांच्या युद्धात श्रीसिंह धारातीर्थी पडता. ती वार्ता ऐकून त्रिमल्लाची ही जीवनज्योत मावळली. पुढे त्या राज्यावर त्याचा प्रधान विशाल देव राज्य करु लागला. त्याच्या पत्नीचे नांव मालनीदेवी असे होते. या उभय दाम्पत्यांच्या ठायी जगनियंत्या परब्रह्म परमेश्वराने गीतोक्तीनुसार साधूंच्या रक्षणार्थ व दुष्टांच्या दुष्टतेच्या नाशार्थ धर्माची स्थापना करण्यासाठी भडोच येथे शुक्रवार ! भाद्रपद शुद्ध द्वितीया !! विक्रम संवत्सर शके ११४२ या दिवशी अवतार धारण केला. हेच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू होत. पुढे जीव उद्धरण्या हेतू महाराष्ट्रात रुद्धपूर येथे गोविंदपभूंना गुरु मानुन जीवोद्धार कार्यास प्रारंभ केला. 

    एकनिष्ठ परमेश्वर भक्ती पासून दूर गेलेल्या जाती व्यवस्थेत स्पृश्यास्पृश्यता मानुन, अस्पृश्यांच्या सावलीचा ही विटाळ मानणाऱ्या उच्च वर्णीय व स्त्री शुद्रादिक दीन, दलित, समाजातील तळागाळातील सर्व सामान्यांसाठी ईश्वरी धर्माची प्रतिस्थापना करून, समाजक्रांती घडवून मोक्ष मार्गाची वाट दाखविण्यासाठी स्वामींनी महाराष्ट्रभर परिभ्रमण केले. 'मानवाने कुणाच्याही पारतंत्र्यात गुलाम होऊन राहू नये. स्वतंत्र वृत्तीने रहावे, असा चैतन्यमय संदेश देऊन सर्वांना शांती व कल्याणाचा मार्ग दाखवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. परमेश्वरीय धर्माची ( ब्रह्मज्ञानाची ) ओळख करून दिली. आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. सर्व प्राणीमात्रांच्या व भुतमात्रांच्या ठायी स्वामींची सम वृत्ती होती. म्हणून ते आपल्या भक्तांना म्हणत की, तुमच्याकडून मूंगीला सुद्धा वैधव्य प्राप्त होऊ नये. हिंसा म्हणजे पाप आहे. त्यामूळे कोणत्याही प्राणी मात्रांची हिंसा करु नये. एखाद्याचे अंत : करण दु : खविणे ही पण एक प्रकारची हिंसा असून अहिंसेचा दिव्य संदेश स्वामींनी जगाला दिला. तुम्ही सर्वाशी प्रिय असे वागावे व प्रिय असे बोलावे कुणाशीही वैरभाव ठेवू नये. सशासारख्या गोजिरवाण्या निष्पाप प्राण्यावर जशी त्यांची कृपादृष्टी होती, तशीच वाघासारख्या कुर हिंस्त्र पशुंवर सुद्धा होती. वृश्चिक, इंगळी, सर्पादि विषारी प्राण्यांवर तसेच मुंगीसारख्या सूक्ष्म जीवांवर सुद्धा स्वामींची कृपा दृष्टी होती. 

    एक वेळ मठात निघालेल्या विंचवाला कापडात धरून मठाबाहेर सोडून देण्यात आले. स्वामी बडनेर भुजंग येथील मंदीरात निद्रीस्थ असतांना, दोन सर्प झुंजत झुंजत स्वामींच्या वक्षस्थळावर येऊन पडले. तेव्हा स्वामींनी आपल्या हातांनी दोन्ही साप दोन्ही दिशांना सोडून दिले. व्याघ्र प्राण्यांची कुर बुद्धी तर त्यांनी अनेक वेळा नष्ट केली. स्त्रियांविषयी स्वामींना अपरंपार करुणा होती. रावसगाव येथे स्वामींचे वास्तव्य असतांना लळीताईसा नामक गुरव स्त्रीचा काळस्फोट नावाचा आजार स्वामींनी दर केला. देमाईसा, आऊसा, लखुबाईसा, जोमाईसा, पोमाईसा, राणाईसा आदि स्त्रियांना ईश्वर, मानवता, गृहव्यवस्था, आजारादि विषयांवर मार्गदर्शन केले. इतकेच काय, पण डोमेग्राम येथे वास्तव्य असतांना स्वामींनी एका बाईचे नाथोबा करवी बाळंतपण ही करून घेतले. स्वामीनी आबालवृद्धांना सारखेच लेखले. लहान मुलांत मुल होऊन स्वामी खेळत असत. पैठण येथे सारंगपंडीताच्या वाड्यात धानाईसा बरोबर स्वामी कवडे खेळतात. 'चिऊचे घर मेणाचे व काऊळ्याचे घर शेणाचे' ही चिऊ काऊंची कहाणी स्वामींनी धानाईसाला सांगितली .


इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह, मनुरिक्ष्वाकवे ऽ ब्रवीत ।।


    या श्रीकृष्ण भगवंताच्या गीतेतील वचनानुसार कृतयुगामध्ये परब्रह्म परमेश्वराने हंसावतारात सनक सनकादिकाना जे ज्ञान दिले तेच ज्ञान त्रेतायुगात श्री दत्तात्रेय प्रभुंनी अर्ळक व यदराजाला दिले. तेच ज्ञान द्वापारयुगात श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निमित्य करून मानवजातीच्या उद्धारासाठी श्रीमद्भगवद्गीतेच्या स्वरुपात सांगितले, व तेच ब्रह्मज्ञान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कलीयुगात ज्ञानसूर्य म्हाइंभट, श्री नागदेवाचार्य, महदंबा, केशीराजव्यास आदि प्रकांड पंडितांना व आपल्या असंख्य भक्तांना त्यावेळच्या समाजप्रचलित मायबोली मराठी भाषेत सांगून ही बहाविद्या ज्ञान गंगा समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले. वाल्याकोळ्याप्रमाणे खुनी, दरोडेखोर असलेल्या अनेक व्यसनाधिन झालेल्या नागदेव भट्टाला. स्वामींनी घडवून मढवून त्याच्या मागील पाप कर्मांचा नाश करून ब्रह्मविद्या ज्ञानाचे दान देऊन या मार्गाचे आधारस्तंभ बनविले. आपल्या ज्ञानमार्गाचा ज्ञानस्तंभ बनवून श्री नागदेवांना या पंथाचे प्रथम आचार्य बनविले. पंथाची धुरा त्यांचेवर सोपवून स्वामींनी उत्तरापंथे गमन केले.

    भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले जीवोद्धरणाचे व्यसन स्वीकारलेले, अलोकिक ईश्वरी विभुतीमत्व होय. म्हणूनच आद्य आचार्य श्री. नागदेव म्हणतात ..... 'जो या ईश्वरी अवताराची एकनिष्ठ भक्ती करुन आपला उद्धार करून घेईल, तोच उद्धरेल. अन्यथा कोणाच्याही भक्तीने व सेवा दास्याने त्याचा जन्मोद्धार होणार नाही'. म्हणून या परमेश्वरीय अवताराची एकनिष्ठ भक्ती ही मानव जातीला संसार तापाच्या भवः दुःखातून तारुण मोक्षाला नेणारी आहे .सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे महाराष्ट्राला धर्मक्षेत्राचे व मराठीला धर्मभाषेचे सुवर्णाचे राज सिंहासन प्राप्त करून देणारे ईश्वरावतार आहेत. स्वामी च्या आज्ञेनुसारच नागदेव आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाइंभट, केसोबास, रवळोबास, लक्ष्मीद्रभट्ट, महदंबा, भास्करभट्ट बोरीकर, कवी डींभ, बाईदेव बास, नरेंद्र कवी, दामोदर पंडीत आदि संस्कृत भाषेच्या प्रकांड पंडीतांनीही असंख्य ग्रंथांची निर्मीती केवळ मराठी भाषेतच केली. तीच परंपरा कायम राखून आजही संत महंत साहित्यिक मंडळी आपल्या साहित्याची निर्मीती ही मराठी मायबोलीतच करतात. 

    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे या पंथावर तसेच मराठी भाषिकांवर अनंत असे उपकार आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे अनाथ, अपंगांचे, दीन, दुबळ्यांचे, स्त्रियांचे माहेरच होते. संसार तापाने पोळलेल्या जीवांना कर्मकांडातून सोडवून परमेश्वराच्या अनन्य भक्तीचा मार्ग त्यांनी उपदेशीला. त्यांनी गरीब श्रीमंत, ब्राह्मण शूद्र, स्त्री - पुरुष असा भेद केला नाही. वर्ण विषमतेला आणि स्पृश्यास्पृश्यतेला थारा दिला नाही. मद्यमांसादि व्यसनांचा त्याग करून मानवाने सात्विक जीवन जगावे प्रयत्नांची कास न सोडता अखंड परमेश्वर स्मरण करावे. मुंगीचेही वैर चिंतू नये. मारीता-पुजीता समान मानावा असा मानवतेचा दिव्य संदेश त्यांनी दिला, अहिंसा धर्माची तर ते साक्षात मुर्ती होते. 'वैऱ्याचा देव असला तरी काय दगडांनी फोडावा?' या उक्तीद्वारे त्यांनी सर्वधर्म समभावाची व समतेची शिकवण दिली.

    आज जग हे बाविसाव्या शतकात पदार्पण करीत आहे. या स्थित्यंतराच्या वाटेवरून चालताना जगाला स्वामींनी निरूपिलेल्या ब्रह्मविद्या ज्ञानाच्या शिदोरीची नितांत आवश्यकता आहे. अकराव्या शतकापासून मानवाला शांती व कल्याणाच्या मार्गाने नेण्याचे कार्य महानुभाव संप्रदाय करीत आहे. स्वामीनी सांगितलेल्या 'ब्रह्मविद्या ज्ञानानुसार मानवाने आपला जीवनपंथ आक्रमिला तर निश्चितच त्यांचा आत्मोद्धार होईल. तो मोक्षाचा अधिकार अवश्य प्राप्त करील. यात तिळमात्र संशय नाही. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सदैव आठवूया. त्यांचे स्मरण करून श्रीचरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊ या.


जय श्री चक्रधरा......

Comments

  1. अतिशय सुंदर माहिती दिली आहे, दंडवत प्रणाम🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. दंडवत प्रणाम खुप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  3. दंडवत प्रणाम खुप छान माहिती दिली

    ReplyDelete
  4. दंडवत प्रणाम,खूपच सुंदर माहिती ज्ञानपिपासू लोकांसाठी उपयुक्त

    ReplyDelete
  5. दंडवत प्रणाम खुप छान माहिती दिली

    ReplyDelete
  6. दंडवत प्रणाम खुपच ज्ञानोक्त आहे

    ReplyDelete
  7. Dandwat pranam 🙏💐🌹💐🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री क्षेत्र पाचांळेश्वर महास्थान

नामस्मरणाची सवय- उतारवयातील एफ.डी.

श्रीदत्तात्रेय प्रभुजीं के २४ गुरू (हिंदी)