महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये व विधी
मुळात आपल्या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत.
परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी या करिता काही क्रिया श्रीचक्रधरांनी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात.
या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत.
१) नित्य विधी
२) निमीत्त विधी
नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत
१] अटन
२] विजन
३] भिक्षा
४] भोजन
५] स्मरण
६] प्रसादसेवा
७] निद्रा
'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे.
हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे.
या सात नित्य विधींची माहिती थोडक्यात अशी -
अटन :- अटन म्हणजे फिरणे. पण हे पुन्हा तीन प्रकारचे आहे
१] स्थानवंदन करीत फिरणे :- चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रात ज्या ज्या स्थानांचा उल्लेख आलाय त्या त्या ठिकाणी जाणे.
२] अधिकारी लोकांशी भेटणे :- पंथामध्ये जे ज्ञातविरक्त असतील त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाणे.
३] निरुद्देश फिरणे :- ईश्वर शोधनी विरहित अन्य कोणताही हेतू न ठेवता फक्त फिरणे
विजन :- एकांतात राहणे, चक्रधरस्वामीचे स्मरण करणे. याला विजन असे म्हणतात.
भीक्षा :- सर्वज्ञ चक्रधरानी भीक्षा मागावी अशी आज्ञा केली आहे पण त्यासाठी अनेक अटी सांगितलेल्या आहेत. "प्राणासी आहार द्यावा इंद्रियांसी न द्यावा" हे फारच महत्त्वाचे तत्व आहे. शिजविलेलेच अन्न मागावे, चातुरवर्ण्य चरैदभैक्षम्......म्हणजेच चारही वर्णीयांकडे भेदभाव न पाळता भीक्षा मागावी. भीक्षा मागताना एका घरी ' क्षण एक उभेया रहावे ' एक क्षण म्हणजे साधरणतः बावीस वेळा एक विशिष्ट 'नाम मंत्रजप' करीत एवढा वेळ होय.
शिवाय उत्सव, मंगलकार्यप्रसंग, श्राध्द असेल अश्या घरी भीक्षेस जाऊ नये. महानुभाव पंथ संपुर्णपणे शाकाहारी होय. ज्या घराच्या परीसरात कोंबडीची विष्ठा दिसेल त्या घरात भीक्षा मागू नये. भीक्षा केव्हा मागावी तर
"निर्धुम नगर झालेया गावांत भीक्षे रीगीजे"
म्हणजे स्वयंपाक होऊन त्या घरच्यांची जेवणे वैगरे आटोपल्यानंर भीक्षा मागावी. म्हणजे फक्त पोटापुरते मिळेल. शिवाय "भीक्षा मागुनी नदीतीरा जाऊनी भोजन करावे" म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा अगदी पाण्याचाही संग्रह करु नये. अपरिग्रह वृत्तीने जगण्यासाठीच भीक्षा मागावी.
स्मरण :- महानुभावांचे आराध्य चक्रधर असले तरी ते मात्र 'पंचकृष्णा'ची भक्ती करतात. गोपालकृष्ण-श्रीदत्तप्रभू-चक्रपाणी-गोविंदप्रभू-चक्रधरस्वामी अशी पंचकृष्ण परंपरा आहे. पंथीय अनुग्रह घेऊन 'पंचनाम' जप माळ धारण करून करावा. त्यातही
"पाचा गुण नामी त्रिकाळ स्मरिजे पाचवे ते निरंतर स्मरिजे"
अशी आज्ञा आहे. या विषयी सूत्रपाठात उल्लेख आहे तो असा,
"पश्चाता प्रहरी उठिजे तो सारस्वत काळ देवता ह्रदयासी ये"
अशा प्रकारे स्मरणाचे महत्त्व येथे विषद केले आहे.
प्रसादसेवा :- हा विधी सुध्दा या पंथाचे आगळे वेगळे पण सांगणारा आहे. स्थानपोथीत सर्वज्ञ कुठे थांबले कोणत्या लीळा कुठे घडल्या याचा उल्लेख आहे. त्या ठिकाणच्या पाषाणाला 'विषेश' असे म्हणतात.
सर्वज्ञ आणि गोविंदप्रभू या दोघांचे वस्र, दात, नख, केस, इत्यादींचे अवशेष म्हणजे 'प्रसाद' होय.
विशेष प्रसादाला नमस्कार आणि त्रिकाळ प्रसादसेवा ही करायलाच पाहिजे. या शिवाय ही सेवा करताना तेथील लीळा आठवाव्यात आणि नित्यदिनीचा पूजावसर आठवावा. यालाच प्रसादसेवा असे म्हणतात.
निद्रा :- सर्वज्ञांचे त्यांच्या लीळांचे स्मरण करीत झोपावे. कारण
'यथा निद्रीस्त मागीले अध्यासेसीची उठी'
म्हणजे
'जेणे अनुलक्षेसी निजला तेणेची अनुलक्षेसी उठिला' असे असते. म्हणजे झोपतांना ज्याचे स्मरण करावे तेच उठताना आठवते. यासाठीच सर्वज्ञांच्या लीळांचे स्मरण करीत निजावे, कारण निद्रेचा काळ हा
'ईश्वर प्रणिधनात' सत्कारणी घालावा.
अशा प्रकारे हे सात नित्य विधी आहेत. नित्यविधींना 'माहेर' म्हटले आहे, कारण या विधीत स्वेच्छा, उत्स्फूर्तता असते.
नैमित्यविधी :- काही निमीत्ताने केल्या जाणाऱ्या विधीना 'निमित्त्य विधी' असे म्हणतात. 'निमित्त्य विधीना' सासर असे म्हणतात. कारण येथे सक्ती कठोरपणा आहे. निमित्त्य विधी पुढीलप्रमाणे आहेत.
१] संग :-
पंथाच्या श्रध्देने जो कोणी नवा व्यक्ती येईल त्याला संग द्यावा. "नवेयासी संग द्यावा" असे सुत्र येथे सांगितले आहे.
२] सांगात :-
पंथाचे जे ज्ञानी अधिकारी
[ ज्ञातविरक्त ] आहे त्यांचा समागम करावा. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. या बाबत सुत्र असे "ज्ञाता विरक्तांचा सांगात करावा"
३] भेट :-
पंथाचे तीर्थक्षेत्रे आणि आधिकारी [ज्ञातविरक्त] यांची भेट घ्यावी ती भेट अवचित किंवा बुध्दया जाऊन करावी. या संबंधी सुत्र सांगते "भ्रमत भ्रमता भेटी का आपजउनी भेटी"
४] सुश्रुषा :-
जेष्ठ साधक व अशक्त रुग्ण अश्या पंथातील अनुसरलेल्या साधकांची वेळ प्रंसगी सेवा करावी. यालाच सुश्रृषा असे म्हणतात. "आपल्या पडीलीयाची सुश्रृषा करावी" असे सुत्र येथे या बाबत सांगता येते.
वरील सर्व विधी हे पुर्वकालीक अनुसरलेल्या, संन्यस्त साधकांसाठी सांगितले आहेत. पण पंथाच्या प्रपंच करणाऱ्या उपासकांसाठी सुध्दा काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
उपासकांसाठी विधी :- या पंथाच्या सांसारीक उपासकांचे चार प्रकार मानण्यात येतात.
१] नामधारक/संसारीक साधक :-
असे उपासक नुकतेच अनुग्रह घेतलेले व पंचनाम माहित असलेले असतात.
२] वेधवंत :-
असे उपासक पंथाचे पूर्वज्ञान पंथाला आकर्षित होऊन पंथात आलेले असतात.
३] बोधवंत :-
या प्रकारचे उपासक पंथाविषयी संपुर्ण ज्ञान बाळगून असतात. आणि पंथीय श्रध्दा पूर्ण आदराने पाळत असतात.
४] वासनिक :-
अश्या प्रकारचे साधक उपासक संख्येने कमीच असतात, अश्या उपासकांना पूर्णकालीक संन्यस्त साधक व्हायचे असते, पण काही सांसारीक जबाबदाऱ्यामुळे वचनपूर्ततेमुळे हे पंथात दीक्षा घेऊ शकत नाही.
वर उल्लेखलेल्या सर्व अनुयायांनी उपासकांनी पुढील सात व्यसनांपासून दूर रहावे.
१] जुगार खेळणे
२] मांसाहार करणे
३] वेश्यागमन करणे
४] परस्री सेवना करणे
५] मद्यपान करणे
६] चोरी करणे
७] हिंसा करणे
अहिंसेबद्दल या पंथाचा कडक कटाक्ष आहे. "हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असु नये"
हे सुत्र हेच सांगते की प्रत्यक्ष तर सोडाच पण दुसरे कोणी हिंसेने वागत असतील तर तेथेही राहू नये.
हिंसा तीन प्रकारची मानतात.
१] आगान्तुक हिंसा म्हणजे मानसिक हिंसा
२] अनारब्ध हिंसा म्हणजे वाचिक हिंसा
३] प्रारब्ध हिंसा म्हणजे कृतीतून हिंसा
अशा प्रकारे वरील 'विधीनिषेध' हे सर्वांसाठी सांगितले आहेत.
आज भारतात इतर धर्मपंथाच्या तुलनेत महानुभाव पंथ संख्येने कमी आहे. पण वरील सर्व विवेचनावरून हे नक्कीच लक्षात येते की भारताच्या संस्कृतीमध्ये या पंथाने गुणात्मक अशी मोलाची भर नक्कीच घातली आहे.
दंडवत प्रणाम.! 🙏🏻
Dandawat pranam 🙏🌷
ReplyDeleteफारच छान लिखान केले,दंडवत प्रणाम
ReplyDeleteदंडवत प्रणाम 🙏
ReplyDeleteदंडवत प्रणाम,
ReplyDeleteदंडवत प्रणाम ❤️🙌🏻🦚😘
ReplyDeleteदंडवत प्रणाम
ReplyDelete🙏👌👌👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteDabdwat prnam
ReplyDeleteदडवंत प्रणाम
ReplyDeleteDandvat pranam
ReplyDeleteDandwat pranam jay shree chakardhar sawami 🙏🙏
ReplyDeleteदंडवत प्रमाण
ReplyDeleteDandvat pranam 🙏🙏
ReplyDelete