सकारात्मक विचार - जादूची कांडी
तुम्हाला सांगतो, भगवंताने फुकट दिलेल्या गोष्टी अनमोल असतात.
त्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिले आहे ; अजून देवाकडून काय अपेक्षा करावी ?
खरं तर रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला धन्यवाद म्हणा ... हे सुंदर जीवन दिल्याबद्दल !
मी हे नित्यनेमाने गेल्या अनेक वर्षापासून करतो. आणि माझ्या सतत आनंदाचा उत्साहाचा आणि सकारात्मक विचारांचा झरा वाहू लागतो.
सकारात्मक विचार हे शब्द थोडे गुळगुळीत झाल्याचे दिसतात हल्ली. पण एक सांगू ?
त्याचा आत्मा हरवलेला नाही हे ..
अंत:र्मनातून स्फुरलेले, रुजलेले सकारात्मक विचार हे एखाद्या जादूच्या कांडीसारखे काम करतात.
रोज रात्री बिछान्यावर झोपायला गेल्यावर दिवसभरात घडलेल्या चांगल्या क्षणांचे स्मरण करा.
त्या सर्वांचे आभार माना. ज्यांच्याशी तुमचा संवाद झाला, भेट झाली. आणि एखादी गोष्ट लागलीच असेल मनाला तर माफ करून टाका. बघा किती मोकळं वाटतं.
मस्त झोप लागते आणि दुसऱ्या दिवसाची पहाट टवटवीत होते.
माझी एक सवय आहे, चांगल्या-चांगल्या विचारांचा मी संग्रह करतो. ते अनेकांना वाचण्यासाठी पाठवतो. हे करण्यामागचा एकच उद्देश आहे “सकारात्मक विचारांची पेरणी !”
एक सकारात्मक विचार माणसाचे जीवन बदलून टाकतो. नैराश्याचा अंधार दूर करणारा दिवा म्हणजे सकारात्मक विचार.
सहज म्हणून सांगतो- रोज सकाळी तुम्ही दहावेळा म्हणा- “ हे परमेश्वरा तू दिलेले जीवन सुंदर आहे.. हे परमेश्वरा तू दिलेले जीवन सुंदर आहे..” अगदी मनापासून म्हणा. देवाच्या साक्षीने म्हणा..व देवाचे आभार माना...
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनोखी ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये जन्म घेईल हे मी अनुभवले आहे. तुम्ही ही नक्की अनुभवा..
आपण पाहतो, आजकालचं जीवन धकाधकीचे आहे स्पर्धेचे आहे. पण ऊर फुटेस्तोवर पळण्याला काय अर्थ आहे? याचा अर्थ असा नाही की थांबावं किंवा गती कमी करावी, असे बिलकुल नाही. पण दैनंदिन जीवन जगताना तांबूस रंगाचा सूर्योदय, पक्षांचा गोड आवाज ३०-४० मिनिटं चालण्याचा आनंद आपल्याला खूप काही देऊन जातो. हे नित्यनेमाने करा. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. खरा आनंद तुमच्या आतच आहे.
चांगला विचार केला की चांगल्या विचारांची माणसं आपोआपच तुमच्या जीवनात येऊ लागतात. नवी स्वप्नं साकारू लागतात. नवा आनंद देऊ लागतात. तुम्ही सकारात्मक विचार करून जीवनाचा आनंद तर घेताच शिवाय इतरांनाही भरभरून वाटू लागता. तर मग कधी अनुभवताय ही जादूची कांडी ?
Comments
Post a Comment